Agrowon Podcast : कापसाच्या भावात चढ उतार सुरुच; तसेच काय आहेत ज्वारीचे दर?
सोयाबीनमध्ये चढ उतार
आतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम आहेत. बुधवारच्या तुलनेत सोयाबीन, सोयापेंडचे भाव काहीसे नरमले होते. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन १०.४८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३३३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ७०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
कापसात नरमाई
कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापसाच्या भावात आज काहिसे दर कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी दुपारपर्यंत कमी होऊन वायदे ७२.७१ सेंट प्रतिपाऊंडवर आले होते. तर देशातील वायदे ५७हजार रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ज्वारीचा बाजार दबावातच
देशभरात मागील दोन महिन्यांपासून ज्वारीचे भाव नरमलेले आहेत. ज्वारीच्या भावातील नरमाई वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आता खरिपातील ज्वारीही काही बाजारांमध्ये दाखल होत आहे. दुसरीकडे ज्वारीला उठावही चांगला आहे. पण शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. सध्या बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीच्या भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.